जानेवारी २०२२ पर्यंत क्रिकेट सामन्यांची पर्वणी, टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागल्यानंतर आता टीम इंडियाचा व्यस्त वेळापत्रक समोर आलं आहे. करोनामुळे अनेक स्पर्धा आणि सामने पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता करोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने स्पर्धाची एका पाठोपाठ एक मांडणी करण्यात आली आहे. क्रिकेट स्पर्धाचं हे व्यस्त वेळापत्रक पाहिलं तर खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार असं दिसतंय. सध्या भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर असून त्याचं नेतृत्व विराट कोहली करत आहे. तर दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून त्याचं नेतृत्व शिखर धवन करत आहे.
भारताचा श्रीलंका दौरा
श्रीलंका दौऱ्यात भारत एकूण ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १३ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. हे सामने २५ जुलैपर्यंत असणार आहेत. या मालिकेसाठी संघात देवदत्त पडिक्कल, मनिष पांडे, नितीश राणा, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायवाड, शिखर धवन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृष्णप्पा गॉथम, कृणाल पंड्या, इशान किशन, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार, चेतन साकरिया, दीपक चहर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, राहुल चहर, वरुण चक्रवर्थी आणि यजुवेंद्र चहल यांचा समावेश आहे.
भारताचा इंग्लंड दौरा
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. या दौऱ्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ४ ऑगस्टपासून सुरु होणारी ही मालिका १४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. भारतीय संघात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल विहारी, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, अक्षर पटेल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, स्रीकर भारत, वृद्धीमान साहा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे.
उर्वरित आयपीएल स्पर्धेचं आयोजन
या दौऱ्यानंतर आयपीएल स्पर्धेचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. युएईत हे सामने खेळवले जाणार आहे. ही स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरु होणार असून उर्वरित ३१ सामने खेळवले जाणार आहे. यासाठी २१ दिवसांचं वेळापत्रक आखण्यात आलं आहे. या २१ दिवसात १० डबलहेडर्स, ७ सिंगल हेडर्स आणि ४ प्लेऑफचे सामने खेळवले जाणार आहे. टी २० विश्वचषकाच्या दोन दिवस आधी ही स्पर्धा संपणार आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धा
१७ ऑक्टोबर २०२१ पासून १४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत युएईत टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी करोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. या अहवालानुसार, राऊंड १ मध्ये १२ सामने होणार असून त्यामध्ये ८ संघ भिडणार आहेत. ८ पैकी ४ संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. सुपर १२ साठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे. सुपर १२ फेरीत एकूण ३० सामने होणार आहेत. ही फेरी २४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. सुपर १२ फेरीत ६-६ संघांना दोन स्वतंत्र गटात विभागले जाईल. सुपर १२ नंतर ३ प्लेऑफ सामने, २ उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल.
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका
टी २० स्पर्धा संपल्यानंतर लगेचच भारतीय संघाची न्यूझीलंडसोबत दोन कसोटी सामन्यांची मालिका आहे. श्रीलंका दौरा, इंग्लंड दौरा, आयपीएल आणि टी २० विश्वचषक स्पर्धेनंतर भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडसोबत खेळणार आहे. या मालिकेबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामने
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचं डिसेंबर-जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. यात ३ कसोटी सामन्यांची मालिका आणि ३ टी २० सामन्यांची मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघांचं येत्या काळात व्यस्त वेळापत्रक असणार आहे. या वेळापत्रकामुळे खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार आहे.
Mumbai Lakshadeep