छापेमारीनंतर पुरावा मिळाल्यावर त्याला राजकीय स्वरूप देणं चुकीचं – फडणवीस
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
 
                                १०५० कोटी रुपयांची दलाली आयकर धाडीतून पुढे आली. बदल्या, टेंडर, मंत्री आणि अधिकारी असे सारे यात आहेत आणि सारे पुरावेही आहेत. या सार्या बाबी आयकर विभागाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत. आयकर खात्याच्या कारवाईला राजकीय रंग देऊ नये.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज(शनिवार) माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
फडणवीस म्हणाले, “दोन प्रकारचे छापे आयकर विभागने टाकले आहेत. त्यामधील पहिल्या छाप्याच्या संदर्भात त्यांनी एक माध्यम पत्रक काढलं आहे. जी मला असं वाटतं अत्यंत गंभीर आहे. मला तर असं वाटतं की माध्यमांना देखील कदाचित त्याचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. कारण, १ हजार ५० कोटी रुपयांची दलाली कशाला म्हणतात? ही त्याच्यामध्ये कागदपत्र सापडले आहेत. त्याचे पुरावे सापडले आहेत. यामध्ये बदल्या आहेत, यामध्ये टेंडर आहेत, यामध्ये मंत्री आहेत, अधिकारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नव्हे देशातला सगळ्यात मोठा अशाप्रकारचा हा पुरावा या छाप्यांमध्ये सापडलेला आहे. आता एजन्सी त्या संदर्भात अधिक खुलासा करेल त्याचवेळी आपल्याला समजेल. त्यापेक्षा जास्त माहिती नाही. पण हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारच्या सगळ्या छापेमारीनंतर पुरावा मिळाल्यानंतर त्याला राजकीय स्वरूप देणं हे चुकीचं आहे.”
तसेच, “त्याचसोबत काल, परवा जी छापेमारी झाली आहे. पाच साखर कारखाने ज्यांच्या विक्रीच्या संदर्भात तक्रार होती. ज्याची चौकशी झाली, चौकशीत विक्रीची प्रक्रिया देखील चुकीची आहे आणि त्याही पेक्षा विकत घेताना जे निधी आले आहेत, ते चुकीच्या पद्धतीने आले आहेत. तुम्ही काळ्या पैशांवर कर भरून किंवा लाचेचा जो पैसा असतो, त्यावर कर भरून तो पांढरा करू शकत नाही, हा नियम आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस एखादा कारखाना विकत घेता, त्यावेळी त्या कारखान्याचा जो काही खरेदीचा पैसा आहे हा योग्य पैसा असला पाहिजे. पण तक्रारी अशा होत्या, या कारखान्यांच्या खरेदीवेळी ज्या कंपन्यांमधून पैसा आला आहे, तो पैसा काही योग्य नाही. म्हणून याची चौकशी ही आयकर विभागाने केली.” असंही यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.
याचबरोबर, “त्यानंतर या कंपन्यांचे जे संचालक होते, त्या संचालकांकडे हा छापा टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांवर छापा टाकला हे चुकीचं आहे कारण, पवार कुटुंबात अजुन लोकं आहेत. ते विविध व्यवसाय करतात, त्यांच्यावर कुठलाही छापा टाकण्यात आलेला नाही. हे चार-पाच जे साखर कारखाने आहेत, ज्यामध्ये काही व्यवहार झाले अशा माहिती आयकर विभागाकडे होती, त्याच्या संचालकांवर टाकलेले हे छापे आहेत, याला कुठल्याही परिवाराशी जोडून पाहणं हे अत्यंत अयोग्य आहे.” असं फडणवीस यावेळी म्हणाले.
 
                         Mumbai Lakshadeep
                                    Mumbai Lakshadeep                                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
            