मुंबई, पुण्यात पुढील दोन दिवस ‘कोसळधार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने तसेच बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने गुरुवारपासून (८ जुलै) कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. १० जुलैपासून पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आज मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे.
राज्याच्या सर्वच भागांमध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मोसमी पाऊस क्षीण झाला आहे. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस असला, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे राज्याच्या बहुतांश भागातील पाणीसाठय़ांवर परिणाम दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जूनच्या अखेरच्या टप्प्यात खरिपाच्या पेरण्या झालेला शेतकरीही दुबार पेरणीच्या संकटाच्या टांगत्या तलवारीमुळे चिंतेत आहे. पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जातो आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणेच आज सकाळपासूनच मुंबई, ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही काही ठिकाणी पाऊस सुरु झालाय. भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनीही यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिलीय.
Mumbai Lakshadeep