कोरोनाच्या कृष्णमेघांमध्ये गणेशोत्सव
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव कोरोनाच्या आणि तिसर्या लाटेच्या सावटातच होत आहे. काही तज्ञांच्या मते तर तिसरी लाट आता आलीही आहे. पण त्याबाबत एकवाक्यता नाहि. गणपती बाप्पा आज येईल तो कोरोनाचे तिसर्या लाटेचे कृष्णमेघ दाटले असतानाच. सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत आणि गणेशोत्सवात गर्दी केल्यास कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याचे कारण दिले आहे. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांच्या पालनाची सक्ति असल्याने गणपती बाप्पांनाही नेहमीप्रमाणे बाळगोपाळांनी गर्दी केल्याचे दिसणार नाहि. बाप्पांचाही नाईलाज आहे. सरकारने तिसर्या लाटेची भीती व्यक्त केली आहे, ती कितपत खरी आहे, हे सांगता येत नाहि. कारण हा प्रकार सापेक्षतेच्या सिद्धांताप्रमाणे आहे. पण जोखिम नको म्हणून सरकारने जर गणेशोत्सवावर निर्बंध घातले असतील तर त्याला आक्षेप घेता येणार नाहि. महाराष्ट्रापुढे केरळचे उदाहरण आहे. केरळमध्ये ओणम साजरा करण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आणि त्याच्या परिणामी आता केरळमध्ये कोरोना केसेसची संख्या भलतीच वाढली असल्याचे दिसले आहे. शिवाय तेथे निपाह हा कोरोनापेक्षाही भयंकर विषाणुचा संसर्गही फैलावला आहे. सणांना होणार्या गर्दीतून कोरोनाचा फैलाव होतो, हे उघड आहे. महाराष्ट्रात सण साजरे करण्याला राजकीय रंग दोन्ही बाजूंकडून दिला जात आहे. पण तो मुद्दा बाजूला ठेवला तरीही भाविकांना यंदा आपल्या बाप्पांचा सण साजरा करताना बंधने पाळावी लागणार आहेत, हे निश्चित आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील एकमेव असा सण आहे की जो १० दिवस साजरा केला जातो. इतका प्रदिर्घ काळ कोणताही सण साजरा केला जात नाहि. आता सार्वजनिक गणेशोत्सव का सुरू केला वगैरे सार्यांनाच पाठ असते. त्याची पुनरूक्ती करण्याची काहीच गरज नाहि. पण एक मात्र खरे की, या सणाला आगळेच वलय आहे. ते इतर कोणत्याही सणाला नाहि. अगदी दिवाळी आणि दसर्याला गणेशोत्सवाचे वलय नाहि. पण कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सवात लोकांच्या एकमेकांकडे जाण्यायेण्यावर निर्बंध आले आहेत. गणेशाच्या आकर्षक आणि भव्य मूर्ती हे या सणाचे आकर्षण असे. आता कोरोनामुळे आता सार्वजनिक गणेशाची मूर्ति जास्तीत जास्त ४ फूट आणि खासगी गणेशाची मूर्ति २ फूट असावी, असा नियम आहे. त्यामुळेही सणाचे वलय हरपले आहे. अर्थात श्रीगणेश हे महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय आराध्य दैवत असल्याने(त्याखालोखाल पंढरपूरच्या विठ्ठलाचाच क्रमांक येतो) लोक गणेशोत्सव तर साजरा करतीलच. भाविकतेत कमी येणार नाहि. खरेतर गणेशोत्सव हा राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उत्कृष्ट संधी अनेक वर्षांपासून राहिली आहे. गणेशोत्सवात लोक प्रचंड खरेदी करतात. कपडे, मोदक, फुले, फळे, हार, किरकोळ खरेदी यांची बाजारपेठ जोरदार फुललेली असते. त्यातून कोट्यवधीचे व्यवहार केले जातात. सध्या कोरोनामुळे अगोदरच भारतीय अर्थव्यवस्था झोके खात आहे. त्यात आर्थिक मंदीमुळेही बाजारपेठेत शांतता होती. आता निदान गणेशोत्सवामुळे काहीशी हालचाल दिसत आहे. मागणी घटल्यामुळे दोलायमान झालेल्या अर्थव्यवस्थेत गणेशोत्सवामुळे चैतन्य निर्माण झाले आहे. तसे ते दरवर्षी होतच असते. पण यंदा त्याची कधी नव्हे ती गरज आहे. कारण यानिमित्ताने मागणी वाढून अर्थव्यवस्था काहीशी गतिमान होईल. पण यंदा त्यावर मर्यादा तर आहेच. कोरोनामुळे लोकांचे रोजगार हिरावून घेतले गेले आहेत. अनेकांना अद्यापही अर्ध्या पगारात काम करावे लागते. लोकल बंद असल्याने अनेकांना कामावर जाता येत नाहि. त्यामुळेही काही जणांचे आर्थिक नुकसान झाले आहे. छोट्या व्यापार्यांचे तसेच मंदिरे बंद असल्याने मंदिरांसमोर हार फुले, पेढे विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भाविकांची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती पाहून साधेपणाने सण साजरा करावा लागणार आहे. गणपती बाप्पांसाठी महाराष्ट्रातील भाविक वर्ग सर्व हौसमौज करायला तयार असतो. पण आता त्याला आपल्या हौसेवर पाणी पडल्याचे पहावे लागेल. गणेशोत्सव साजरा करताना यंदा मोठ्या गणपती मंडळांचे प्रत्यक्ष दर्शन मुंबईत तर बंदच करण्यात आले आहे. त्यात चूक काहीही नाहि. कारण त्यातून संसर्ग होण्याची मोठी शक्यता आहे. तसेच गणपती मंडळांना ऑनलाईन दर्शन देण्याचेही आदेश दिले आहेत. आता ते कितपत साध्य होते, हे सांगता येत नाहि. आणि भाविकांनाही ऑनलाईन दर्शनात फारसा रस असेल, असे वाटत नाहि. गणेशोत्सवाची झळाळी या निर्बंधांमुळे गेली आहे. पण त्याला कुणाचाच इलाज नाहि. भाविकांनीही कोरोनाचे निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा करावा. त्यातच शहाणपण आहे. याचे कारण नवा जो डेल्टा व्हेरियंट आहे, तो लसींना जुमानत नाहि. त्यामुळे लस घेतल्याने आपण बेफिकिर झालो, असे कुणालाही वाटत असेल तर त्याचा तो गैरसमज आहे. डेल्टा व्हेरियंटवर कोणत्याही लसीचा कसलाच परिणाम होत नाहि. त्याचा संसर्गाचा वेगही जास्त आहे. मृत्युचा दरही जास्त आहे आणि विशेष म्हणजे त्यावर औषध नाहि. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना भाविकांनी संयम स्वतःहून पाळावा. तरच आपण पुढचे सारे गणेशोत्सव साजरे करायला जिवंत राहू शकू.
Mumbai Lakshadeep