पाच भाषांमध्ये ' पुष्पा ' चे पहिले गाणे प्रदर्शित, सामाजिक माध्यमांवर उत्स्फूर्त प्रतिसाद
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत अभिनेते अल्लू अर्जुन यांच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि बहुभाषी पुष्पा चित्रपटातील विशेष आणि पहिले गाणे शुक्रवारी सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित झाले. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत हे गाणं प्रदर्शित करण्यात आले असून सर्व भाषांमधे सर्व सामाजिक माध्यमांवर विशेषतः यु-ट्यूबवर अग्रस्थानी आहे. गाण्यास 1 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे.
अभिनेते अल्लू अर्जुन यांचे नवे रूप आणि संगीत दिग्दर्शक देवी श्रीप्रसाद यांच्या या कलाकृतीसाठी मोठया प्रमाणावर नागरिकांद्वारे प्रतिसाद आणि कौतुक होत आहे. गाण्याची सर्व भाषांमध्ये विक्रमी घोडदौड सुरु आहे. गायक विजय प्रकाश यांनी कन्नड , बेनी दयाल तमिळ , राहुल नम्बियार मल्याळम , शिवम यांनी तेलुगू आणि विशाल दादलानी यांनी हिंदीत हे गाणे गायले आहे.
युवा आणि प्रथितयश संगीत दिग्दर्शक देवी श्रीप्रसाद यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात पाच भाषेतील पाच आघाडीच्या गायकांनी या विशेष गीतास आवाज दिला आहे. याद्वारे पुष्प चित्रपटातील संगीत कशा प्रकारचे असणार याची विशेष माहिती चाहत्यांना आणि रसिकांना झाली आहे. पुष्पा साठी संगीत दिग्दर्शक देवी श्रीप्रसाद यांच्या संगीताची चाहते वाट पाहत आहेत.
अभिनेते अल्लू अर्जुन यांच्या पुष्पा चा पहिला भाग : दि राईज डिसेंबर महिन्यात नाताळाला प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन यांच्या ' पुष्पा ' ची पहिली झलक पाच भाषांमध्ये यापूर्वीच प्रदर्शित करण्यात आली आहे. मागील वर्षी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. चित्रपटाची निर्मिती मायथ्री मुव्ही मेकर्स करणार आहेत. चित्रपटात अभिनेत्री रश्मीका मंदाना, प्रकाश राज, जगपती बाबू, फहाद फासल आदी कलाकार काम करणार आहेत.
'अला वैकुंठ पुरमलो ' च्या भव्य यशानंतर अभिनेते अल्लू अर्जुन यांच्या आगामी चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आपल्या आवडत्या 'बनी ' ला नवीन चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच आतुर आहेत. अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा अल्लू अर्जुन- दिग्दर्शक सुकुमार एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी आर्या आणि आर्या 2 या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.
Mumbai Lakshadeep