मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा:कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार,: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सांगली: सांगली, कोल्हापूर, कोकण भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती ओढावली आहे. यामुळे नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. आज मुख्यमंत्री पूरबाधित गावांची पाहणी करत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोल्हापूर दौरा केला होता.
सकाळी अकरा वाजल्यापासून उद्धव ठाकरे अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज आणि सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'ज्या क्षणी अतीवृष्टी होणार, संकट येणार हा एक अंदाज आला. तेव्हापासून प्रशासन कामाला लागले. शक्य होईल तिथल्या धोकादायक वस्त्यांमधील नागरिकांचे आपण स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 4 लाख नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. जीवितहानी होऊ नये, हा आपला प्रधान्यक्रम होता.'
कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'या संकटातून मार्ग काढणारच, किती नागरिकांना मदत करावी लागेल याची माहिती घेतली जात आहे. आपल्याला कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे. काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील. मात्र कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हे माझे वचन आहे. यासोतबच पण कटू निर्णयालाही तुम्हाला साथ द्यावी लागेल. नाहीतर 2005, 2019 2021 अशी पुरांची मालिका सुरुच राहील. दरवर्षी नुकसान आणि मदत हे चक्र भेदावे लागणार आहे. कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे.' असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
...पॅकेज कुठे जाते माहित नाही
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'संकट आले की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढ्या हजार कोटीचे पॅकेज… मात्र हे पॅकेज कुठे जाते हे कुणालाही माहिती नाही… मला अशी थोतांड येत नाही. मला खोटे वागता बोलता येत नाही जे करायचं ते प्रामाणिकपणे केले जाणार आहे. ते केल्याशिवाय राहणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Mumbai Lakshadeep